";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ख्यातनाम नाट्य-चित्र अभिनेते डॉ. श्रीराम लागू (वय ९२) यांचे निधन

ख्यातनाम नाट्य-चित्र अभिनेते डॉ. श्रीराम लागू (वय ९२) यांचे निधन

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for डॉ. श्रीराम लागू

पुणे : ख्यातनाम नाट्य-चित्र अभिनेते डॉ. श्रीराम लागू (वय ९२) यांचे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी हदृयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पुत्र आनंद अमेरिकेत असतात. गुरुवारी सकाळी ते पुण्यात पोचल्यावर डॉ. लागू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे, अशी माहिती लागू यांचे कुटुंबीय दीपा लागू तसेच डॉ. शुभांगी कानिटकर यांनी दिली.

डॉ. जब्बार पटेल, पुणे (प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष) :

मला डॉ. लागू हे नाव उच्चारल्यावर प्रथम आठवते, ते 'डॉ. येणआर' असे जाहीर झाल्यावरचे वातावरण...मी तेव्हा बी. जे. मेडिकल महाविद्यालयात शिकत होतो. डॉ. तेव्हा लंडनला होते. त्यांनी केलेली 'वेड्याचं घर उन्हात'..सारखी नाटकं तेव्हा विलक्षण चर्चेत होती. डॉ. लागू यांना पाहण्याआधी मी त्यांच्याविषयी ऐकूनच खूप होतो, त्यामुळेच त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची फार उत्सुकता होती. आम्ही तेव्हा पीडीएमध्ये काम करायचो. भालबा केळकर तेव्हा डॉ. लागूंविषयी बोलायचे. त्यांनीच एक दिवस सांगितले, की आज श्रीराम येणार आहे लंडनहून...तेव्हा मी डॉक्टरांना प्रथम पाहिले, ते इम्प्रेशन आजही कोरले गेले आहे. अतिशय भारदस्त व्यक्तिमत्त्व, विलक्षण तेजस्वी असे त्यांचे दर्शन होते. त्यांच्याकडे पाहताच, ही व्यक्ती बुद्धिमान असणार, हे उमगायचे. त्यांच्याशी बोलायला सुरवात केल्यावर तर त्यांच्या आवाजाचेही चेटूक व्हायचे...डॉक्टरांशी नंतर गाढ परिचय, स्नेह जुळला, तरीही हे पहिले इम्प्रेशन कधीच पुसले गेले नाही. त्यांच्या बुद्धिमत्तेचा दरारा वाटायचा, पण ते मात्र अगदी सहजपणे बुद्धिमत्ता कर्णाच्या जन्मजात कवचकुंडलांसारखी वागवायचे. कारण त्यांचा स्वर नेहमी ऋजू असायचा. त्यांचा विरोधही त्याच स्वरात व्यक्त होत असे. मी त्यांना कधीच अद्वातद्वा बोलताना अनुभवले नाही. टोकाचा विरोध असलेल्या मुद्याविषयी देखिल ते संयमित स्वरातच बोलायचे.

त्यांच्यासोबत नंतरच्या काळात मी अनेकदा काम केले. मी दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना, त्यांच्यातल्या अभिनेत्याचे मला जे दर्शन घडले, तेही असेच अविस्मरणीय होते. दिग्दर्शकाकडून प्रत्येक भूमिकेविषयी सूक्ष्म तपशिलांसह सारे जाणून घेण्याची त्यांची पद्धत मी अनुभवली आहे. अर्थात मी हे मराठी चित्रपटांसंदर्भात बोलत आहे. रंगमंच, चित्रपट आणि छोटा पडदा सगळीकडेच डॉक्टर सारख्याच सहजतेने वावरल्याचे दिसते. जी भूमिका करायची, ती सर्वार्थाने शोधण्याची त्यांची मानसिकता असे. शिवाय ती व्यक्तिरेखा पुरेशी तर्कसंगत वागते का, हेही ते तपासून घेत. त्यासाठी ते कष्ट करत, वाचन करत. मनन करत. प्रश्न विचारत...असे करणारे अभिनेते दुर्मिळ आहेत. डॉक्टर त्यापैकी होते.

डॉक्टरांकडे आकर्षून घेणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचा आवाज. त्यांचा 'स्वर' विलक्षण होता. भूमिकेनुरूप तो कणखर, नाजूक, जरबेचा, व्याकूळ...होत असे. पण, त्यांच्या आवाजाला मूर्तिमंत कारुण्याचा एक पदर होता. त्यांच्यातील माणूसपण त्या कारुण्याचे अस्तर घेऊन वावरत असे. त्यामुळे डॉक्टरांची प्रत्येक भूमिका आणि त्यांचा टोन त्या त्या भूमिकेसाठी प्रेक्षकांना 'कन्व्हिंन्सिंग' वाटायचा. अभिनेत्याच्या आयुष्यात त्याचे असे कन्व्हिंन्सिंग असणे, फार फार महत्त्वाचे असते. ही किमया, किंवा अशी जादू फारच मोजक्या अभिनेत्यांपाशी असते, ती डॉक्टरांकडे होती. दुसरी गोष्ट, म्हणजे आपल्या आ‌वाजाचा डॉक्टरांनी फार बारकाईने अभ्यास केला होता. आवाजाची 'साधना'च त्यांनी केली होती. त्यांच्या आवाजाला फिरत होती, मार्दव होती, ऋजुता होती.

खर्जाचा त्यांचा स्वर वरच्या पट्टीतही सहज सामर्थ्याने संचार करत असे. यामुळेच डॉक्टर भलीमोठी स्वगते फार सुंदर सादर करत. ऐतिहासिक नाटकांतील भाषा पेलत आणि सामाजिक नाटकातील त्यांचा स्वर प्रेक्षकांना आपलासा करणारा ठरत असे.

नट म्हणून डॉक्टर जसे अनुभवले, तसेच माणूस म्हणूनही त्यांचे वेगळेपण नेहमीच जाणवत राहिले. ते भूमिकेप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही कधी अतार्किक वागले नाहीत. त्यांच्या विचारांचा पायाच तर्कसंगतीचा असल्याने कृतीही तर्काला धरूनच असे. त्यांचे आणि विजय तेंडुलकरांचे संवाद मी अनेकदा ऐकले आहेत. दोघेही आपापल्या मुद्यावर ठाम असत, पण डॉक्टर नेहमी तर्काला धरून विधाने करत असत आणि त्यावर कायम राहत.

गुडलक विश्वविद्यालयाचे कुलगुरू

बी. जे. मेडिकल कॉलेजात शिकत असताना, डॉक्टर तेथील कान-नाक-घसा विभागात कार्यरत होते. काम संपले की सायकली हातात घेऊन आम्ही डेक्कन जिमखान्याच्या दिशेने चालत निघायचो. वाटेत अखंड गप्पा सुरू असायच्या. डॉक्टरांकडून कित्येक विदेशी अभिनेते, दिग्दर्शक, चित्रपट, रंगभूमी, त्यावरील गाजणारे प्रयोग...याविषयी भरभरून बोलत राहायचे. गुडलक चौकात त्या हॉटेलमध्ये बसून डॉक्टरांच्या गप्पा म्हणजे आमच्यासाठी विश्वविद्यालयातले दिवस होते आणि त्या विश्वविद्यालयाचे डॉक्टर हे एकमेव कुलगुरू होते. माणसाला सतत आपल्या वर्तमानासोबत भविष्याचे आणि भूतकाळाचे सजग भान हवे, असे डॉक्टर म्हणत असत. त्यांनी स्वत: कधीच हे भान सुटू दिले नाही. इतरांनीही ते सोडू नये, यासाठी ते प्रयत्नरत राहिले. त्यांच्या सहवासात येणारा माणूस त्यामुळे चार्ज होत असे, हे मी अनुभवले आहे.

माझ्याविषयी डॉक्टर भरभरून बोलले…ते क्षण आठवले की अश्रू दाटतात

मला नुकताच विष्णुदास भावे सुवर्णपदकाचा सन्मान मिळाला. तो सत्कार डॉक्टरांनी करावा, असे सगळ्यांना वाटले. त्यानुसार डॉक्टर आले खरे, पण अलीकडे त्यांना विस्मरणाचा त्रास असल्याने ते काही बोलणार नाहीत, असे ठरले होते. फक्त सत्कार त्यांच्या हस्ते करायचा, असे नियोजन होते. प्रत्यक्षात व्यासपीठावर बसल्यावरही डॉक्टर मला हळूच म्हणाले,'जब्बार, आपण इथे कशासाठी आलोय?' तेव्हा मी त्यांना समारंभाची आठवण दिली. ते हसले. माझा सत्कार त्यांनी केला. आणि एकदम ते माइकच्या दिशेने गेले. कुणाला काही समजण्याआधीच ते बोलू लागले, 'हा जब्बार, याला मी त्याच्या तरुण वयापासून पाहिलंय. मेडिकल कॉलेजमध्ये होता. आम्ही एकत्र बरेच काम केले आहे...वगैरे वगैरे...ज्या डॉक्टरांना एक मिनिटापूर्वीचे आठवत नव्हते, ते माझ्याविषयी त्या क्षणी भरभरून उत्स्फूर्त बोलले…मला ते क्षण आठवले की डोळ्यांत अश्रू दाटतात.

श्रीराम लागू यांचा जीवनपट

- जन्म : १६ नाेव्हेंबर १९२७, सातारा

- पूर्ण नाव : श्रीराम बाळकृष्ण लागू.

- शिक्षण : एमबीबीएस, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे.

- शालेय जीवनापासूनच नाटकांत काम करण्याची आवड. पुण्यातील पी.डी.ए. नाट्यसंस्थेच्या माध्यमातून नाटकात भूमिका.

- नाक, कान, घश्याचे तज्ञ म्हणून ओळख. १९५० च्या दशकात पुण्यात पाच वर्षे डाॅक्टर म्हणून सेवा. नंतर कॅनडा, इंग्लंड येथे वैद्यकीय उपचारांचे प्रशिक्षण घेतले. - १९६० च्या नंतर पुण्यासह टांझानियात वैद्यकीय व्यवसाय केला. - १९६९ मध्ये पूर्णवेळ नाट्य अभिनेता म्हणून कामास सुरुवात. 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकापासून व्यावसायिक रंगभूमीवर एन्ट्री. - पी.डी.ए, रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिंदू, रूपवेध, आविष्कार, आय.एन.टी. या नाट्यसंस्थांशी नाळ जुळली. अभिनयासाेबत नाट्यदिग्दर्शनही केले.

- गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंड, चाणाक्य विष्णुगुप्त, कांती मडिया या अनुवादित गुजराथी नाटकाचे दिग्दर्शन. - वसंत कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर या दाेघांच्या नाटकात डाॅ. लागू यांनी भूमिका केल्या.

- गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे, प्रेमानंद गज्वी,श्याम मनोहर यांच्या नाटकातही काम केले.

- तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे खळबळजनक नाटक डाॅ. लागूंनी दिग्दर्शित केले. त्यात भूमिकाही केली.

- वि. वा. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकरांची भूमिका गाजली. - शांताराम बापू यांच्या 'पिंजरा' चित्रपटातील मास्तरची भूमिका अजरामर ठरली.

- 'सामना', 'सिंहासन', 'मुक्ता' आदी चित्रपटातील भूमिकाही गाजल्या.

- 'सुगंधी कट्टा', 'देवकीनंदन गोपाला', 'चंद्र आहे साक्षीला' या यशस्वी चित्रपटातील भूमिकांनाही उत्स्फूर्त दाद मिळाली.

- 'साैतन' या हिंदी चित्रपटातील भूमिकाही गाजली.

- पु. लं.च्या 'सुंदर मी होणार', सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारित ' सूर्य पाहिलेला माणूस' हे नाटकही गाजले.

- अभिनयासाेबत सामाजिक जीवनातही उल्लेखनीय काम. विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या चळवळीत काम केले.

- पद‌्मश्री, संगीत नाटक अकादमी सन्मान, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गाैरव.

- नटसम्राट' नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी केली. त्यातील एक वाक्य, आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे.' त्यावरून डाॅ. लागू यांनी 'लमाण' नावाचे आत्मचरित्र लिहिले.

- शब्दांकन : जयश्री बोकील

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 46

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds