";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल ओतून टेंभ्याने पेटवले

तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल ओतून टेंभ्याने पेटवले

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

नागपूर - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली. तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करीत जवळपासच्या मदतीची याचना केली. त्या वेळी धावत येऊन नागरिकांनी तत्काळ तरुणीच्या अंगावर पाणी ओतून आग विझविली. या घटनेत ही तरुणी ४० टक्के भाजली असून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे आरोपी विकेश ऊर्फ विकी नगराळे (२९) विवाहित असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला अाहे. तरुणीला पेटवून नागपूरच्या दिशेने पळून जात असलेल्या विकी नगराळेला पोलिसांनी टाकळघाट येथे अटक केली. पीडित तरुणी आणि हा नराधम दोघेही हिंगणघाटपासून १६ किमी अंतरावर असलेल्या दारोडा गावचे रहिवासी आहेत. तरुणी हिंगणघाट येथील मातोश्री आशाताई कुमावार महिला वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

दिनचर्येप्रमाणे सोमवारी सकाळी पीडित तरुणी दारोडा येथून सकाळच्या एसटी बसने हिंगणघाटला पोहोचली. नांदोरी चौकात उतरल्यावर ती पायीच महाविद्यालयाकडे जाण्यासाठी निघाली. महाविद्यालयापासून शंभर मीटर अंतरावर आरोपी विकी नगराळे मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी करून तिच्या प्रतीक्षेत होता. तिला पाहताच विकीने तिच्या दिशेने धाव घेत पेट्रोल भरलेली बाटली तिच्या अंगावर ओतून दुसऱ्या हातात असलेल्या पेटत्या टेंभ्याने तिला पेटवून दिले. यानंतर विकी मोटारसायकलने तेथून पसार झाला. ही घटना घडली त्या वेळी रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ होती. पीडित युवती वेदनांनी किंचाळत होती. आसपास काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करून रहिवाशांना बाहेर आणले. लोकांनी जमा होऊन तिच्या अंगावर पाणी ओतले व कशीबशी आग विझविली. स्थानिक तळवेकर नावाच्या रहिवाशाने तिला आपल्या वाहनाने हिंगणघाटमधील प्राथमिक आरोग्यच केंद्रात तिला दाखल केले. तोवर हिंगणघाट पोलिसही रुग्णालयात दाखल झाले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने व उपचाराच्या पुरेशा सोयी नसल्याने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी तिला नागपूरला हलवण्याचा सल्ला पोलिसांना दिला. त्यामुळे पीडितेला तातडीने नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले.... टेंभा पेटवून तयार होता नराधम

सोमवारी सकाळीच विकी दारोडा येथून मोटारसायकलने हिंगणघाटला पोहोचला. पीडितेच्या येण्या-जाण्याचा मार्ग माहिती असल्याने तो कॉलेजजवळच तयारीत होता. विकीने मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला उभी केली. एका काडीला कापड गुंडाळून त्याने टेंभा तयार केला. पेट्रोल भरलेल्या प्लास्टिकच्या बाटलीचे तोंड त्याने कापून घेतले. त्यानंतर त्याने टेंभाही पेटवून तयार ठेवला होता. एका प्रत्यक्षदर्शीने त्याला टेंभा पेटवताना पाहिले होते. मात्र, थंडीचे दिवस असल्याने त्याने टेंभा पेटवला असावा असाच त्याचा समज झाला होता, अशी माहिती त्याने दिली.

दोन वर्षांपासून बोलणेही टाळत होती पीडिता

एमएस्सीपर्यंतचे शिक्षण झालेली पीडिता स्वत: बीएडचे शिक्षणही घेत आहे, तर आरोपी विकेश हा रेल्वे गाड्यांमध्ये डबे पोहोचवण्याचे काम करतो, असे पोलिसांनी सांगितले. विकीचे लग्न झाले असून त्याला चार महिन्यांची मुलगीही आहे. पीडिता आणि विकी या दोघांमध्ये पूर्वी मैत्री होती. दोन वर्षांपासून पीडितेने त्याच्याशी साधे बोलणेही टाळले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नेमक्या कारणाचा शोध घेतोय : पोलिस

एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे हिंगणघाट पोलिस मान्य करीत आहेत. मात्र, विकीने हे पाऊल उचलण्याचे नेमके कारण काय? याची चौकशी सुरू असून अद्यापतरी आम्ही काहीही सांगू शकत नाही, अशी माहिती हिंगणघाटचे पोलिस निरीक्षक बंडीवार यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली.

आरोपीचा यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न

आरोपी विकी याने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, अशी कुणकुण ऐकायला मिळत आहे. मात्र, यासंबंधीची कुठलीही तक्रार पोलिसांकडे नाही. त्याचे कुटुंबीयदेखील याची वाच्यता करीत नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

कॉलेजलजवळही पाहिले नव्हते...

पीडितेला पेटवून देणारा तरुण विकी याला आम्ही कधी कॉलेजजवळही पाहिले नव्हते, असे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग तुळसकर यांनी सांगितले. सहा महिन्यांपूर्वी पीडिता या कॉलेजमध्ये तासिका तत्त्वावर रुजू झाली. ती सीनियर कॉलेजला वनस्पतीशास्त्र हा विषय शिकवते. तिच्याबद्दल कुठलीही तक्रार नव्हती, असे ते म्हणाले.

डॉक्टर म्हणाले, श्वसनसंस्थेलाही गंभीर दुखापत :

पीडित युवतीची प्रकृती अतिशय चिंताजनक असून पुढील ७२ तास अतिशय महत्त्वाचे असल्याची माहिती ऑरेज सिंटी रुग्णालयाचे प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉ. दर्शन रेवणवार यांनी सांगितली. पीडिता ४० टक्के जळाली आहे. तिची वाचा गेली आहे. तिची दृष्टी कायम असण्याची शक्यता कमी आहे. ग्रेड-३ दर्जाच्या जळाल्याच्या जखमा तिला झाल्या आहेत. तिच्या चेहऱ्याच्या काही भागाचा कोळसा झाला आहे. डोके, उजवा खांदा, पाठ, मान, डावा हात गंभीर भाजलेला आहे. तिच्या श्वसनसंस्थेलाही गंभीर दुखापत झाल्याने तिला मोठ्या प्रमाणात प्राणवायू द्यावा लागत असल्याचे डॉ. रेवणवार यांनी सांगितले. डॉ. रेवणवार यांच्या नेतृत्वात डॉक्टरांचा मोठी चमू तिच्या प्रकृतीवर पूर्णवेळ देखरेख ठेवून आहे, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी दिली.

नागपूरकडे पलायन, टाकळघाटला अटक

पीडितेला पेटवून दिल्यावर घटनास्थळावरून पसार झालेला विकी पोलिसांचा सासेमिरा चुकवण्यासाठी मोटारसायकलने नागपूरकडे येण्यासाठी निघाला होता. मात्र, तोवर हिंगणघाट पोलिसांनी वेगाने तपास करून त्याचे नाव, मोटारसायकलचा क्रमांक आणि मोबाइल फोन क्रमांक शोधून काढला होता. मोबाइल टॉवर लोकेशनच्या आधारे तो नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर स्थानिक पोलिसांनी नागपूर ग्रामीण तसेच शहर पोलिसांना अलर्ट केले होते. नागपुरात दाखल होण्यापूर्वीच ग्रामीण पोलिसांनी िवकीला टाकळघाटजवळ अडवून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला चौकशीसाठी वर्धा येथे रवाना करण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक एम. प्रसन्ना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: त्याची चौकशी सुरू केली. विकीविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात ३०७, ३२६ (अ) भादंविअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 112

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds